कृतज्ञता तुमच्यातील आशावाद जिवंत ठेवते!
आपली काही स्वप्न असतात. काही छोटी, काही मोठी.
सगळीच स्वप्न एकदम पूर्ण होत नसतात. ज्याची त्याची वेळ आली की ती गोष्ट निश्चितच
मिळते. जे आपल्याला हवं आहे ते आपल्याला मिळणारच हा विश्वास आपल्या मनात घट्ट
रुजवावा लागतो.
आत्ता या क्षणी थोडसं तुमच्या आयुष्यावर एक नजर
टाका. तुमच्याकडे आता अशा कितीतरी वस्तू असतील ज्या पूर्वी तुमच्याकडे नव्हत्या.
उदा. आता ज्या फोनवर तुम्ही ही पोस्ट वाचत आहात तो फोन. काही दिवसांपूर्वी किंवा
काही आठवड्यांपूर्वी किंवा काही वर्षांपूर्वी हा फोन तुमच्याकडे नव्हता. पण तो
आत्ता तुमच्याकडे आहे.
अशाच कितीतरी वस्तू असतील गोष्टी असतील ज्या
पूर्वी तुमच्याकडे नव्हत्या पण आत्ता आहेत. तुमची नोकरी, तुमची गाडी, तुमचे घर (भाड्याचे
असले तरी), तुमची पत्नी/पती, तुमची मुले, तुमच्या नव्या मित्र/मैत्रिणी, अशा
कितीतरी गोष्टी तुम्हाला नव्याने मिळाल्या आहेत. यात वस्तू असेल, काम असेल किंवा
नाती असतील, या सगळ्यांची कधी तरी तुम्ही इच्छा धरली होती आणि या सगळ्या इच्छा आज
तुमच्या आयुष्यातील वास्तव आहेत. या सगळ्यांवर एक नजर टाकल्यानंतर आपल्या इच्छा
पूर्ण होतात याची तुम्हाला नक्की खात्री पटेल. हेच स्वतःला वारंवार सांगा की, आधीही
मी जी स्वप्न पहिली ती पूर्ण झाली आणि आताही माझी स्वप्न पूर्ण होत आहेत.
आपल्याला हवं ते मिळत नाहीये, आपल्या मनासारखं
जगता येत नाहीये, आपल्याला आनंद मिळत नाहीये अशा विचारात जर तुम्ही हरवत असाल तर एकदा
हे सगळं आठवा. आयुष्याकडून आपण फक्त मागतच तर आलो आहोत आणि आयुष्याने कितीही दिलं
तरी आपली हाव संपत नाहीये. यात दोष कुणाचा?
इच्छा स्वप्न पाहूच नयेत असं अजिबात नाही. पण या
सगळ्या प्रवासात आपल्या हाती जे काही लागलं आहे त्याची किमान दखल तरी घ्यायला हवी
की नको? आज ज्या गोष्टींमुळे आपण थोडाफार तरी आनंद उपभोगत आहोत, थोडं तरी आयुष्य
सुखकर झालं आहे, हे जे आपल्या आजूबाजूला सगळं आपलं म्हणून आहे त्याला काहीच महत्त्व
नाही का?
Source : Google Image |
म्हणून सतत दुखी कष्टी होण्यापेक्षा सध्या जे
हातात आहे त्याची दखल घेऊन त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला हवी. कारण, या सगळ्या
गोष्टी आहेत म्हणून तुम्ही पुढची मोठी स्वप्नं पाहू शकता, ती पूर्ण करू शकता. आता
जे तुमच्याजवळ आहे तेच उद्या तुमच्या भविष्याचा पाया असणार आहे.
आपल्या मनासारखं काही होतच नाही. आपल्याला काही
मिळतच नाही. आपण कधी इतरांप्रमाणे मजा करणार, आनंद लुटणार अशा नकारात्मक विचारांत
स्वतः बुडवून टाकण्यापेक्षा. आज माझ्याजवळ हे-हे आहे, ज्याच्या सहाय्याने मी एक
चांगले भविष्य निर्माण करू शकते/शकतो हा विश्वास स्वतःला दिला पाहिजे.
यासाठी एक उदाहरण पाहूया. आता तुमच्याजवळ टू-व्हीलर
आहे पण तुम्हाला फोर व्हीलर घ्यायची इच्छा आहे. फोर व्हीलर घेण्यासाठी तुम्ही
धडपडत आहात, पैसे जमवत आहात पण मध्येच काही तरी मोठा खर्च येतो आणि साठवलेले पैसे
अशाच आगंतुक गोष्टींवर खर्च होऊन जातात. मग पुन्हा तुमचं फोर व्हीलर घेण्याचं
स्वप्न लांबणीवर पडतं. आता जर तुम्ही असं म्हणाल की मी ठरवेन ते कधी होतच नाही.
मनासारखं काही मिळतच नाही, तर तो स्वतःवर अन्यायच ठरेल. कारण, एकेकाळी तुम्ही अशाच
पद्धतीने ही आता असलेली टूव्हीलर घेतली की नाही, टू व्हीलरचं जर तुमचं स्वप्न
पूर्ण झालं असेल तर फोर व्हीलरचं स्वप्न का नाही पूर्ण होणार? नक्कीच होणार.
त्यासाठी तुमच्या मनातील आशावाद कायम जागा राहायला हवा.
मनातील आशावाद जागा ठेवण्यासाठी तुम्हाला
कृतज्ञता नक्कीच उपयोगाला येईल. जेव्हा केव्हा तुम्हाला वाटेल की तुमची स्वप्नं
तुम्हाला हुलकावणी देत आहेत, तेव्हा फक्त मागे सध्या केलेल्या स्वप्नावरून एक नजर
फिरवा आणि ती स्वप्न पूर्ण झाल्याबद्दल वैश्विक शक्तीचे आभार माना.
तुमच्या कृतज्ञतेच्या या यादीत अगदी छोट्यातील
छोट्या गोष्टीपासून मोठ्यातील मोठ्या गोष्टींचा समावेश होऊ शकतो. अगदी घरातील टेबल
खुर्चीपासून ते दरातील टू-व्हीलर पर्यंत, तुमच्या नोकरीपासून ते तुमच्या
नात्यापर्यंत सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही कृतज्ञ असलं पाहिजे. दिवसातून एकदा जरी तुम्ही
कृतज्ञता व्यक्त केलीत तरी तुमच्या मनाला एक तजेला मिळेल. आपल्या स्वप्नापर्यंतचा
प्रवास पूर्ण करण्याची ऊर्जा आणि त्यासाठी लागणारा संयम मिळेल.
कृतज्ञतेला तुमची चांगली मैत्रीण बनवा आणि बघा
ती नेहमीच तुमच्यातील सकारत्मकता आणि आशावाद जिवंत ठेवेल.
Source : Google Image |
Comments